माहेर…

गेल्या दोन दिवसांपासुन भावीची तयारी चालु होती… डाळीच्या पिठाचे लाडु, अनारसं करुन ठेवले होते…

आज दुपारच्या जेवणात अळुच्या वड्या आवर्जुन केल्या होत्या..

दारावरच्या थापेनं तिच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडुन वाहत होता…तिची लेक माहेरपणाला आली होती…

तिला घट्ट मिठी मारुन तिचे मुके घेतले…तिला आंजारलं गोंजारलं…

रोजच्या माय लेकीच्या गप्पा रंगल्या…रोज राञी झोपताना तिच्या पाठी—पोटावर—डोक्यावर हात फिरवुन तिला कुशीत घेऊन झोपायची…

तिला काय हवं काय नको ते बघतं होती…तिला साधा ग्लासही उचलु देत नव्हती…कोणत्या दिवशी कोणता पदार्थ करावा ह्याची यादीच बनवुन ठेवली होती…तिचे सर्व लाड पुरवत होती…

चिमणी सारखे दिवस भुर्रकन उडुन गेले…माहेरपणाला आलेल्या लेकीचा डोळे भरुन निरोप घेतला… डोळ्यात नविन आस घेऊन पुन्हा लेक माहेरपणाला येण्याची…

गेल्या काही वर्षांपासुन भावीनं घेतलेला निर्णय… भावीला काही अडीअडचणी, मुलांची दुखणी आली की सतत तिला तिच्या आईचा मदतीचा हात असायचा…फक्त कामांसाठीचं तिची आई घरी यायची…

अन् भावीच्या मनात विचार आला

मी माहेरी गेली की ती मला एकाही कामाला हात लावु देत नाही…तिच्या स्पर्शासाठी आसुसलेलं माझं मन अन् त्यासाठी मला माहेरी जाण्याची ओढ… मग आईलाही अश्या स्पर्शाची अन् माहेरची गरज आहे … आजही आठवतं घरात काही अडीअडचणी आल्या की आई माहेरी जात नव्हती…आमच्या मध्ये गुंतली असायची…कधीतरी माहेरी जाणारी आई..आजी गेल्यानंतर तिचं माहेरच तुटलं… आपणच तिची आई बनावं अन् तिला माहेरपण द्याव…तिलाही ममता —मायाचा स्पर्श द्यावा…

अन् तिच्या आईचा माहेरचा प्रवास चालु झाला…

खरचं प्रत्येक मुलीनं आपल्या आईला माहेर द्यावं…तिलाही त्या स्पर्शाची गरज असते…

V.G

Advertisements

भावी पिढी साठी…

What’s app मुळे शाळे पासुन ते सहकारी मित्र मैत्रीणी जवळ आले. अनेक गट निर्माण झाले.

सुप्रभात संदेशा पासुन ते राजकीय ,धार्मिक , लेख ,विनोद अश्या अनेक post चा रोज भडीमार असतो. काही जण फक्त वाचण्याचे काम करतात पण कधीच प्रतिसाद देत नाहीत तर काही जण ठराविक जणांच्या post ला प्रतिसाद देतात.

एखाद्या post वरून क्रिया प्रतिक्रिया होतात.ज्यांनी post केले त्यांचा राग द्वेष केला जातो पण त्यात सत्यता असेल तर कोणीही स्विकारत नाही.काही दिवसांनी त्या व्यक्तीशी अतिशय गोड भरभरून बोलतात कि जणु दाखविले जाते सर्व काही विसरलो.पण ते जाणवते मनापासुन नव्हे अजुनही राग सलसलत असतो…

काही जणांसाठी काही जणचं आवडीचे असतात. त्यांच्या शुभेच्छा वरुन दिसते.

काही जण फक्त पैसा प्रतिष्ठा बघुन मैत्री करणारे.

एखाद्याने adult post टाकली तर ती व्यक्ती वाईट वळणावर आहे. वाईट प्रतिमा ठरविल्या जाते पण त्या post चा आस्वाद सर्व घेत असतात.फक्त जगाला दाखवून देणे मी त्यातला नव्हे. सर्व जण विचारांनी तितके समजदार असतात.

व्यक्ती तितक्या प्रवृत्ती

एकंदरीत बघितले तर एक छोटे जग पण त्यातही एकमेकांचा राग द्वेष करणे . एकीचा, आपुलकीचा आणि माणुसकीचा अभाव.

आपण विसरतो भावी पिढी आपल्या पावलांवर पाऊल ठेवून चालते. आपण काय शिकवण देत आहोत. परंपरागत जे होत आहे ते आताही होत आहे.

आपण असे आचार विचार अंमलात आणले ज्यात लिंग- भेद ,जात पात – धर्म नसेल.प्रत्येकाने फक्त समोरच्याला एक माणुस म्हणून बघितले. मानवताला महत्त्व दिले तर हळुहळु सुधारणा होईल . भावी पिढी पण हेच शिकेल. भावी जग असे निर्माण होईल जिथे फक्त एकमेकां बद्दल आपुलकी , आस्था , शांती ,समाधान..

पण आता पासुन सुरूवात केली तर भावी पिढी मध्ये बदल दिसतील. अशक्य काहीच नसते फक्त मनाची तयारी असावी लागते .

कदाचित काही जणांना पटणार नाही. सर्वांना स्वातंत्र्य आहे. वैयक्तिक मत सुध्दा.

पण शांतपणे विचार करा. भावी पिढीसाठी…

V.G

वारस…

नुकतीच दुपारची काम उरकवुन बसते न् बसते तोच कोणीतरी दारावर थाप मारली…दार उघडले तर समोर विणा…बर्‍याच दिवसांनी माझ्या घराला तिचा पाय लागला होता…

चहाचा घोट घेत गप्पा मारत असताना तिच सतत घड्याळाकडेच लक्ष होतं…

मलाही माहित होत ती सतत काळजीत असते ते मुलाच्या…दोन मुलींच्या पाठीवर झालेला मुलगा… गेल्या पाच—सहा वर्षांपासुन औषधांच्या भडीमारावरच सामान्य आयुष्य जगत आहे…जराही धडपडला तर तिचा जिवात जीव नसतो…अगदी जिवापाड जपते…

पण मला तिच्या मानसिकतेचा अतिशय राग…आज राग जरा अनावर झाला अन् तिच्यावर तुटुन पडली…

तिला स्पष्ट अन् परखड शब्दातच बोलली…

“विणा आज तुझ्या मुलाच्या परीस्थितीला तुच जबाबदार आहेस…मुलगा म्हणजे वारसदार, वंशाचा दिवा अशी तुझी अन् तुझ्या नवर्‍याची मानसिकता…अन् सोन्यासारख्या दोन मुलींच्या पाठीवर मुलगा जन्माला घातलास…आज तुझ्या ह्या मानसिकतेचं फळ भोगतोय तुझा मुलगा…त्या जिवाचा दोष काय?अग तो इतर मुलांशी खेळत नाही, बागडत नाही…सतत एकटाच रहातो… तो ज्या स्थितीतुन जात आहे त्यासाठी तुच दोषी आहेस…मुलगा अन् मुलगी मध्ये फरक करणारी तु…तु हे विसरलीस तु सुध्दा एक मुलगी आहेस…

अग आता जे झाले ते झाले…पण मुलाच्या बाबतीत पुढचा विचार केला आहेस का?आज तो तुझ्या पखात वाढत आहे…पण उद्याचे काय? भविष्यात त्याला जगाचा सामना हा करावाच लागेल…चार—चौघात वावरावे लागेल…आत्मविश्वासाच्याच जोरावर तो हे करु शकेल…सतत औषधांच्या मारानी दिवसेंदिवस कमजोर बनत जाईल…त्याच्यातील आत्मविश्वास जागृत करण्याची गरज आहे…त्याच्यात सकारात्मकता आणावी लागेल…तुझ्या अती काळजीने तो अधिकाधिक कमजोर बनत जाईल…अग त्याला खरी गरज आहे ती मानसिक तज्ञाची…मानसिकतज्ञ हे वेड्यांचे डाॅक्टर ही मानसिकता प्रथम डोक्यातुन काढुन टाक…मानसिक तज्ञ त्याच्यात आत्मविश्वास तर आणतील शिवाय मजबूत बनवतील जेणेकरुन त्याचं मनोबल वाढेल…

आज तुला माझ्या बोलण्याचे वाईट वाटले असेल किंबहुना रागही आला असेल पण मी जे काही बोलली ते लेकरासाठी…त्याच्या भल्यासाठी…शांतपणे विचार कर….तुलाच सत्य स्थिती कळेल”

विणा फक्त निशब्द होती… तिलाही कळत होते…पण तिच मन मानत नव्हतं…

विणा गेल्यावर मनात विचारांचा कल्लोळ माजला होता..

वास्तविक बघता मुलींनी काही कर्तृत्त्व गाजवली की लोकं, समाज हे मुलींसोबत आई —वडीलांचेही कौतुक करतात…म्हणजे एका दृष्टीने बघीतले तर घराण्याचे अन् आई—वडीलांचे नाव निघतेच ना….अत्यंत महत्वाचं म्हणजे मुली ह्या मुलां एवढ्याच कर्तबगार अन् कर्तृत्वान असतात…तरी हा फरक का केल्या जातो?

आजही बर्‍याच मुली शिक्षणापासुन वंचित आहेत…भृणहत्या होत आहेत…

मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, घराण्याचा वारसदार ही मानसिकता पिढ्या न् पिढ्या चालत आलेली मनुष्यानीच निर्माण केलेली आहे मग ही मानसिकता आपण बदलुही शकतो..ही सुरवात आपणच करु शकतो…अन् हा बदल झाला तरच मुलींची संख्या वाढेल अन् शिक्षणापासुन वंचित रहाणार नाहीत…

V.G

बदल अन् परीवर्तन…

मनुष्यात होणारे बदल हे एकतर परीस्थितीनुसार अथवा आलेल्या कडु— गोड अनुभवांनी होतात पण परिवर्तन हे आंधळा विश्वास न ठेवता स्वःताची तर्कबुध्दी वापरुन अंर्तमनाला न पटणार्‍या गोष्टींचा स्विकार न करणे किंबहुना अती खोलात जाऊन त्या गोष्टींचा उलगडा करुन वैचारीक पातळीत झालेला बदल…

बदल हा बाह्य असतो पण परीवर्तन हे आंतरीक अन् बाह्य बदल…आचार विचारांमध्ये झालेला बदल.. बदल अन् परीवर्तन ह्यात हा एक मोठा फरक असतो…

प्रत्येक मनुष्यामध्ये बदल होत असतो पण परिवर्तन हे मोजक्या लोकांमध्येच होतात…

प्रत्येक व्यक्तीमध्ये परीवर्तन झाले तर विश्व हे फार वेगळं असेल…वैचारीक पातळी ही अधिकाधिक उच्च दर्जाची राहिल…

V.G

आठवणी…

आठवणी ह्या उसळणार्‍या चेंडुसारख्या असतात…उसळत उसळत कुठे नेऊन पोहचवतील हे कुणास ठाऊक…कधीही, केव्हाही, कुठेही उसळणार्‍या आठवणी…अंर्तमनाच्या एका कप्य्यात साठवणचं जणू…मिञ, आप्तस्वकीयांपासुन जरी लांब असलो तरी सोबत असतात त्या आठवणी अन् एकटेपणातील सोबती… जगायला लावणार्‍या काही आठवणी…

अनुभव अन् आठवणी यांचा निकटवर्ती संबंधच जणू…आलेल्या अनुभवांची साठवण होत त्याचेच रुपांतर आठवणीत होत जाते…सतत आठवणारे अनुभव अन् आयुष्याला नविन वळण देऊन जाणारे …आठवणी आहेत तर आपण आहोत…आठवणी नसत्या तर आयुष्य हे असतं जणू कोरडा पाषाण…

V.G

अखंड विश्व…

आज स्वप्नात दिसलं अखंड विश्व…

देशांची सिमा नसलेलं विश्व…

युध्दाची भाषा नसलेलं विश्व…रक्तपाताला थाराही नसलेलं विश्व…

निसर्ग अन् माणसांचा मेळचं जणू..

जिवघेण्या स्पर्धा नसलेलं…स्वतंञ, स्वावलंबी अन् आदर्श आयुष्य जगण्यासाठी आवशक असणारं शिक्षण होतं….

राग, द्वेष, मत्सरतेचा लवलेशही नसलेलं…

निरभ्र आकाशासारखी मनं होती…मैञीचं नातं , निसर्गाला जपत शांती समाधानी माणसं वावरत होती…

निधर्मी असं अखंड विश्व होतं…मानवतावादी असं विश्व…

होती फक्त माणुसकी अन् माणुसकी…

VG

प्रेम…

शब्दांवर केलेलं प्रेम…

ह्रदयात जतन केलेले शब्द…

शब्दांशी हितगुज करणार अंर्तमन…

शब्दांना हळुवार पणे स्पर्श करणारे तर कधी शब्दांशी खेळणारं मन…

परीसीमा नसणार प्रेम…

शब्दांशी एकरुप झालेलं मन…

अंर्तमनाच्या बाहुपाशात सामावलेले शब्द…

निरागस, स्वच्छ मनांचं झालेलं मिलन…

जगाचा विचार न करणारे अंर्तमन अन् शब्द…

आयुष्यभराची साथ देणारे शब्द…

कशाचीही अपेक्षा नसलेलं,तमा न बाळगणारे प्रेम…

असतं फक्त प्रेमाचं विश्व…

मनापासुन झालेलं खरं प्रेम…

जिवापाड जपलेलं प्रेम…

V.G